पोक्सो व विनयभंग कायद्याचा दुरूपयोग नको: सुशिलकुमार पावरा
खोट्या गुन्ह्यांना पोलीस व न्यायाधीशांनी आळा बसवावा: सुशिलकुमार पावरा
निरपराध व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्रास दिला जातो
दापोली: पोक्सो व विनयभंग कायद्याचा दुरूपयोग लोकांनी करू नये,पोक्सो व विनयभंग संदर्भातला पोलीस आयुक्त मुंबई यांचा आदेश कायम ठेवा,आदेश मागे घेऊ नका,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री,दिपक केसरकर
शिक्षणमंत्री,पोलीस आयुक्त,
पोलीस आयुक्तालय मुंबई ,पोलीस महानिरीक्षक,
कोकण परीक्षेत्र,कोकण भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई ,जिल्हाधिकारी, रत्नागिरी,पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,मा.संजय पांडे पोलीस आयुक्त, मुंबई यांनी पोक्सो व विनयभंगाच्या वाढत्या खोट्या गुन्ह्यांना आळा बसावा,या चांगल्या हेतूने दिनांक 06/06/2022 रोजीचा आदेश काढला आहे.त्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो.खरं पाहता,सध्या जुन्या वादातून, मालमत्तेच्या वादातून किंवा पुर्व वैमनस्यातून, द्वेषभावनेतून पोक्सो व विनयभंगाच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेक निर्दोष लोकांना पोक्सो व विनयभंग सारख्या खोट्या गुन्ह्यात नाहक अडकवले जात आहे. गुन्ह्या केला नसला तरी चांगल्या चांगल्या प्रसिद्ध व्यक्तींना ,समाजसेवकांना,विशेष करून शाळेतील शिक्षकांना बनावट गुन्ह्यात अडकवून नाहक बदनामी केली जात आहे.शाळेत शिक्षकांचा विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापनात रोजचा संबंध येत असतो.शिक्षक विद्यार्थी यांचे गुरु शिष्याचे पवित्र नाते असते.परंतु मागील काही वर्षांपासून पोक्सो व विनयभंगासारख्या कायद्याचा काही पालक,समाजकंटक व राजकारणी गैरवापर करून अनेक शिक्षकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून नाहक बदनाम करत आहेत व शिक्षकांच्या नोकरीला सुद्धा अडथळा निर्माण करत आहेत. खोट्या गुन्ह्याद्वारे गुरु शिष्याच्या नात्याला कलंकित करत आहेत. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी पाठीवर शाबासकीची थाप मारणे,कौतुकासाठी मायेने डोक्यावर हात फिरवणे, विद्यार्थ्यांना चांगली शिस्त व संस्कार मिळावेत, म्हणून मोठ्याने बोलणे किंवा रागावणे,प्रसंगी धाक दाखवणे व चुकून कधी हात लागणे इत्यादी गोष्टीं पोक्सो व विनयभंग सारख्या कायद्यात कसे बसतात? काही पालक व समाजकंटक याचा गैरफायदा घेत पोक्सो व विनयभंग सारख्या खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवून शिक्षकांचे अथवा कोणत्याही निर्दोष व्यक्तींंचे आयुष्य उद्ध्वस्त करत असतील तर हे कितपत योग्य आहे.पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपपोलीस निरीक्षक तसेच स्थानिक पोलीसांवर अशा संवेदनशील प्रकरणात तेथील राजकारणी,पुढारी , आमदार, खासदार हे दबाव आणत असतात आणि गुन्हा घडला नसला तरी दबावाखाली पोलीसांना कायद्यानुसार गुन्हा नोंद करून घ्यावा लागतो. याऐवजी अशा प्रकरणात पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधिक्षक सारख्या वरीष्ठ पदावर असणा-या पोलीस अधिका-यांना अधिकार दिल्यास कायद्याचे रक्षण होऊन खोटे गुन्हे कमी होतील .पोलीस आयुक्त मुंबई यांनी अनुभवातून काढलेला आदेश हा विचारपूर्वक, अभ्यासपूर्ण ,खोट्या गुन्ह्यांना आळा बसवणारा असा योग्य निर्णय आहे. उलट पोक्सो व विनयभंगा सारखे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर 20 वर्षे तुरुंगवास व आर्थिक दंड असा कडक कायदा करण्यात यावा,जेणेकरून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कमी होईल.
पोक्सो व विनयभंग सारख्या प्रकरणात खरोखर गुन्हा घडला असेल तर त्याचे आम्ही समर्थन करत नाहीत, आरोपींना कायद्या नुसार शिक्षा झालीच पाहीजे ,परंतु या कायद्याचा दुरूपयोग करून निर्दोष व्यक्तींंना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणा-यांना सुद्धा कठोर शिक्षा झाली पाहिजेत. म्हणून समाजहित व मानवहीत लक्षात घेऊन मा.पोलीस आयुक्त मुंबई यांचा 6 जुन 2022 रोजीचा आदेश कायम ठेवावा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी शासनाकडे केली आहे.