सिटीजन वेल्फेअर असोसिएशन, बदलापूर यांचा दुसरा वर्धापन दिन सोहळा संपन्न. .!
बदलापुर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
सिटीजन वेल्फेअर असोसिएशन- बदलापूर या सेवाभावी संस्थेचा दुसरा वर्धापन दिन काल मोठ्या उत्साहात पार पडला . बदलापूर पश्चिम येथील अजय राजा हॉल येथे संस्थेचे अध्यक्ष श्री दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य व बदलापूर शहरातील अनेक सेवाभावी वृत्तीचे नागरिक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बदलापूर पश्चिम चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी सिटीजन वेल्फेअर असोसिएशनच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली . बदलापूरच्या विविध समस्यांचा संस्थेद्वारे ज्या पद्धतीने पाठपुरावा केला जातो असे काम करणारी संस्था प्रत्येक शहरात असायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले .
सध्याच्या काळात इतर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूपच वाढते आहे याची चिंता व्यक्त करतानाच सिटीजन वेल्फेअर च्या माध्यमातून बदलापूरच्या नागरिकांना सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच , मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले .
कार्यक्रमाला उपस्थित असलेले मार्गदर्शक ध्रुव अकॅडमीचे संचालक श्री महेश सावंत यांनी तरुणांना विधायक कामामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले . प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा , हाच स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले .
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र नरसाळे यांनी संस्थेचा अहवाल व आतापर्यंत केलेल्या विविध लोकोपयोगी कामांचा अहवाल सादर केला .
संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री किशोर गुरव यांनी या सेवाभावी संस्थेची स्थापना का व कशा प्रकारे झाली याबद्दल उपस्थित त्यांना अवगत केले . विशेषतः निवृत्त नागरिकांनी त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर निस्वार्थीपणे देशाच्या , समाजाच्या जडणघडणीसाठी करण्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला
अध्यक्षांच्या वतीने संस्थेचे ज्येष्ठ सदस्य , अनुभवी मार्गदर्शक श्री दिलीप नारकर यांनी उपस्थितांना संस्थेच्या कामाचे महत्त्व पटवून देतानाच येणाऱ्या काळातील संपूर्ण देशात सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या , बदलत्या बदलापूरचे चित्र मांडले . पुढील काही वर्षातच बदलापूरचा खूप वेगाने विकास होणार आहे परंतु त्यासोबतच अनेक समस्या निर्माण होतील , या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाप्रमाणेच नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यायला हवा यासाठीचे आग्रही मत त्यांनी मांडले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास सावंत यांनी केले. यावेळी कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर केवळ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी , प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून संस्था स्थापन करण्यात आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले . याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री बाळासाहेब सावंत याने रुजविलेल्या विचारांची त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली .
संस्थेचे उपाध्यक्ष श्री विलास हंकारे यांनी उपस्थितांचे आभार मानताना अजय राजा हॉलचे मालक श्री प्रफुल्ल थोरात यांचे विशेष कौतुक केले . सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असणारे श्री. थोरात संस्थेच्या प्रत्येक सोहळ्यासाठी आपला जागा उपलब्ध करून देतात यासाठी त्यांचे विशेष आभार मानले .
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब देशमुख , संस्थेच्या ज्येष्ठ सदस्य इस्वलकर मॅडम, खजिनदार मंगेश सावंत , चंद्रकांत चिले , विलास साळगावकर , एकनाथ गायकर, दीपक वायंगणकर , निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप शिरसाट साहेब, पंडित साहेब, इत्यादी सदस्य उपस्थित होते .