सिटीझन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने बदलापुरात सायबर क्राईम- जनजागृती शिबिर संपन्न .. .!
बदलापूर (प्रतिनिधी – गुरुनाथ तिरपणकर)
राजकारण विरहित समाजकारण या तत्त्वाचा स्वीकार करून, चर्चेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यांना योग्य दिशा देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सिटीजन वेल्फेअर असोसिएशन या संघटनेद्वारे काल बदलापुरात, वाढत्या सायबर क्राईम विरोधात जनजागृती व लोकप्रशिक्षणासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरुण क्षीरसागर व त्यांचे सहकारी श्री हुंदे यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले व उपस्थित नागरिकांच्या विविध शंका व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली .
श्री हुंदे यांनी सायबर क्राईम करणाऱ्या लोकांची मानसिकता व कार्य करण्याची पद्धत नेमकी कशी असते याचे सविस्तर विश्लेषण करून उपस्थित नागरिकांना या गुन्ह्यांच्या संदर्भात कोणता उपाययोजना व कशा पद्धतीने कराव्यात याची सविस्तर माहिती दिली .
याप्रसंगी बोलताना श्री. क्षीरसागर यांनी नागरिकांना काळजी बाळगण्याचे आवाहन केले . शासनाद्वारे किंवा बँकांद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांमध्ये योग्य ती उपाययोजना खबरदारी घेतलेली असते परंतु लोभाच्या आणि मोहाच्या एका क्षणामुळे आपण असे गुन्हे करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या जाळ्यात अडकतो . त्यासाठीच ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या व कोणतीही शंका आढळल्यास त्वरित पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन केले . परंतु अजूनही नागरिक अशा गुन्ह्यांच्या बाबतीत गांभीर्य दाखवत नाहीत याबद्दल खंत व्यक्त केली .
संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री दीपक नारकर यांनी याप्रसंगी सिटीजन वेल्फेअर असोसिएशनच्या विविध प्रकारच्या लोकोपयोगी कामांचे उपस्थितांना माहिती दिली . सायबर क्राईम सारख्या विविध प्रश्नांवर जनजागृती व लोकप्रशिक्षण अत्यावश्यक असून त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली .