खासदार अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसविणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
दिनांक 01/06/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. पी. आर. पाटील यांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल वरुन काहीतरी काम असल्याचा 23.00 वा. SMS आला. त्यानी तात्काळ त्यांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहीते यांना मदत करण्यास सांगीतले. त्याअन्वये PSI मोहिते यांनी तात्काळ नमुद मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, कॉलर यांनी त्यांचे नाव प्रबोध चंद्र सावंत असे सांगून ते खासदार श्री अमोल कोल्हे यांचे PA असलेबाबत कळविले व त्यांचे मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असल्याचे सांगून त्यांना तातडीने मदत करावी म्हणून सांगितले. तसेच त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक 09834395809 यावर PSI मोहिते यांनी तात्काळ संपर्क केला असता सदर कॉलर याने त्याचे नाव रविकांत मधुकर फसाळे असे कळवून त्यांचे बोलेरो वाहनाचा शहादा येथे अपघात होवून 04 लोक मयत झाले असून 07 ते 08 लोक जखमी असुन त्यांचेवर नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत असे सांगितले. त्याबाबत हद्दीतील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून PSI मोहिते माहिती घेत असताना सदर कॉलर यांनी वारंवार कॉल करून त्यांना गुंतवून ठेवले. त्यानंतर सदर कॉलर रविकात फसाळे यांनी पुन्हा PSI मोहिते यांना कॉल करून त्यांना तात्काळ अम्ब्युलन्सने शिवाजीनगर पुणे येथे जाणे असल्याने वाहनात डिझेलसाठी 7,000/- रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगीतले. त्यावर PSI मोहिते यांनी त्यांना आम्ही फक्त पोलिस मदत देऊ शकतो असे सांगितले व ही बाब PSI मोहिते यांनी खासदार यांचे PA प्रबोध चंद्र सावंत यांना सांगितली. त्यानंतर पुन्हा रविकांत मधुकर फसाळे यांनी PSI मोहिते यांना थोड्या वेळाने पुन्हा कॉल करून सांगितले की, डिझेल चे काम झाले आहे, कृपया आम्ही सकाळपासून काहीही खाल्ले नाही उपाशी आहोत, कृपया आम्हाला जेवणासाठी 2000/- रुपयांची मदत करावी, जेणेकरून प्रवासादरम्यान काहीतरी जेवण करतील.
PSI मोहिते यांनी सदर कॉलर यांना अपरात्र असल्याने व दूर प्रवास करणे असल्याने तसेच खासदार श्री अमोल कोल्हे यांचा मदत करणेबाबतचा निरोप असल्याने PSI मोहिते यांनी माणूसकीच्या नात्याने त्यांचे मोबाईल क्रमांक 09834395809 रविकांत मधुकर फसाळे याचेवर फोन पे अकाऊंटवर 1,000/- रुपयांची मदत पाठविली. त्यानंतर अपरात्र झाल्याने आज सकाळी दिनांक 02/06/23 रोजी PSI मोहिते यांनी नियंत्रण कक्षामार्फत सदर अपघाताचे घटनेबाबत खात्री केली असता अशा प्रकारची घटना ही नंदुरबार जिल्हा हद्दीत तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यात देखील घडलेली नसल्याचे समजले. त्यामुळे अनोळखी व्यक्ती रविकांत मधुकर फसाळे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वापरून पोलिसांना अपघाताबाबतची खोटी माहीती देवून पोलिसांची आर्थिक फसवणूक केली तसेच पोलीस खात्याला अपघाताबाबत खोटी माहीती देवून विनाकारण कामाला लावून शासकीय कामकाजाचा वेळ वाया घालवला आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे 434/2023 भादवी कलम भा.द.वि. कलम 420, 182 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे……