फेस ग्रामपंचायतचे सरपंचसह दोन महिला सदस्य यांना शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले
ग्रामपंचायत फेस येथे 2020 ते 2025 या पंचवार्षिक ची निवडणूक झाली होती. निवडणूक झाल्यानंतर दोन महिला सदस्य व सरपंच यांनी ग्रामपंचायत गावठाण सरकार गट नं.5 व 180 वर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य श्री. किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयात दिनांक 16/02/2021 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम1958 चे कलम 14 पोटकलम (ज) (3) नुसार सरपंच लहू पूना भिल सदस्य राजश्री गणेश पाटील, सदस्य पद्माबाई रगदेव भिल यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र करणे बाबत विवादित अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी सदर अर्ज दिनांक 29/07/2022 रोजी फेटाळून लावला होता. अर्जदार यांनी मा. विभागीय आयुक्त सो. नाशिक यांच्या कडे दिनांक 12/08/2022 रोजी अपील दाखल केले होते. त्या अनुषंगाने श्री. किशोर आत्माराम पाटील यांच्या तर्फे ॲडव्होकेट श्री. राहुल श्रीराम कुवर (पाटील) यांनी युक्तिवाद केले.
निकाल पत्रामध्ये नमूद केल्यानुसार सदस्य राजश्री गणेश पाटील यांचे पती व सासू या कुटूंबियांनी मौजे फेस येथील शासकीय गावठाण गट नं.180 सरपंच लहू पुना भिल व सदस्य पद्मबाई रगदेव भिल यांनी शासकीय गावठाण गट नं.05 मध्ये अतिक्रमण केले. असल्याचे स्पष्ट होत. असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ज-3) मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हाधिकारी नंदुरबार यांचेकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 03/2021 मध्ये दिनांक 29/07/2022 रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे. राजश्री गणेश पाटील सदस्य पद्माबाई रगदेव भिल सदस्य व लहू पूना भिल सरपंच यांनी ग्रामपंचायत फेस येथील सदस्य,सरपंच पदावर पुढे चालू राहण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तरी तक्रारदार व गावकरी यांनी मा. विभागीय आयुक्त यांच्या आदेशाचे स्वागत केले.