आदिवासी कोळी जमातीची बदनामी करणाऱ्या लकी जाधवचा निषेध..
चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील इतर आदिवासी संघटनांना सोबत घेऊन कोळी जमातीच्या विरोधात चोपडा तहसिलदार यांना निवेदन द्यायला आलेला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव (महादेवकोळी/इगतपुरी) याने कोळी जमाती बद्दल गरड ओकतांना बोगस गैर आदिवासी म्हणून कोळी जमातीची बदनामी व अवहेलना केलेली आहे. सदर इसम मजकूर याला आमच्या घटनादत्त अधिकार असलेल्या कोळी जमातीचा कोणताच अभ्यास नसताना त्याने तालुक्यातील इतर आदिवासींना हाताशी धरून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे तालुक्यातील आदिवासी कोळी समाजामध्ये चीड निर्माण झालेली आहे. कोळी समाज संघटनांनी आजपर्यंत इतर आदिवासींचा चुकूनही विरोध केलेला नाही, किंवा त्यांच्या योजना हडपण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलटपक्षी आदिवासी टोकरेकोळी जमातीचा निधी लाटण्याचे काम इतर आदिवासी करीत आहेत. आणि वरून चोरांच्या उलट्या बोंबा झालेल्या आहेत. बाहेरून येऊन येथील आदिवासी कोळी व इतर आदिवासी जमातींमध्ये संघर्ष पेटविण्याचे काम लकी जाधव सारखे फितुर करीत आहेत. त्याने समोरासमोर बसून आदिवासी कोळी हे अनुसूचित जमातीचे नाहीत असे सिद्ध करून द्यावे, अन्यथा आम्ही सिद्ध केल्यानंतर त्याने कोळी जमातीची व शासन प्रशासनाची माफी मागावी. त्याने अमळनेरचे प्रांत कैलास कडलग यांच्याबद्दलही बेछूट आरोप केलेले आहेत. ते सर्व चुकीचे व द्वेषभावनेचे आहेत. लकी जाधवसह त्याच्या सर्वच संघटनांवर प्रशासनाने अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे. आम्ही कोळी समाजाचे सर्व पदाधिकारी प्रशासनासोबत आहोत. त्याच्यासोबत आलेल्या सर्वच संघटनांचा व त्याने केलेल्या बेताल वक्तव्याचा आम्ही चोपडा तालुका व जळगाव जिल्हा आदिवासी कोळी जमातीतर्फे जाहिर निषेध निषेध करीत आहोत, अशी संतप्त भावना चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.