ऑनलाईन नोंदणी करून कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा
-पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार: दिनांक 10 जून 2023 (जिमाका वृत्त): ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतंर्गत राज्य शासनामार्फत कामगार विभागाच्या वतीने विविध योजनेचा लाभ देण्यात येत असून कामगार विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले आहे.
‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते आज नंदुरबार तालुक्यातील कोळदा, समशेरपूर, कोरीट, शिंदे गावांत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती मोहिनी वळवी (कोळदा ), उपसरपंच आनंद उत्तम गावित, श्रीमती मंदा चौधरी (समशेरपूर ) उपसरपंच रेवता भिल, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे, डी.एन.राजपूत, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की, बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, बांधकाम कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी अर्थसहाय्य,बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती, प्रधान मंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल, नोंदणीकृत बांधकाम कामागाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पत्नीस व पतीस अर्थसहाय्य, मध्यान्ह भोजन योजना, कामगारांच्या मुलींचा विवाहाकरीता अर्थसहाय्य, कामगारांना अत्यावश्यक संच वाटप, तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या कामगारांच्या विविध योजनेंचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर बांधकाम कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. कामागारांसाठी विविध योजनेंचा लाभ इतर जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून देत होतो. परंतू या योजनेचा लाभ जिल्ह्यातील कामगारांना मिळावा यासाठी मी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खांडे विंनती व त्यांनी माझी विनंती मान्य करुन जिल्ह्यातील कामगारांना विविध योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलतांना डॉ.गावित म्हणाले की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यात खासदार डॉ.हिना गावित यांनी केंद्र सरकारच्या उज्जवला गॅस योजनेतंर्गत मोठया प्रमाणात गॅस संचाचे वाटप केले. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्रत्येकांला घर तसेच प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. येत्या काळात आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज, भजनी मंडळासाठी साहित्य तसेच इतर विविध योजनेचा लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांचे ‘ड’ यादीत नाव नसलेल्या तसेच ज्या लोकांना घर नाही अशा पात्र व्यक्तिंना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार आहे. एका रेशनकार्डवर एकच घरकुल मिळत असल्याने घरकुलचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डचे विभक्तीकरण करावे यानंतरच घरकुल योजनेचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,कामगार उपस्थित होते.
0000000000