अपघात रोखण्यासाठी शालेयस्तरावर जनजागृती करावी
-जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार,दिनांक.8 जून 2023 (जिमाका वृत्तसेवा):रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षितता नियमाची शालेयस्तरावरच जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व जनआक्रोश, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यशाळेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता गणपत गावित, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, जनआक्रोश संस्थेचे रविंद्र कासलेकर, अजय परमार, प्रकाश खांडेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येकांने स्वंयप्रेरणेने रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बहुताश अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, अशा अपघातात त्यांना डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर प्रत्येकांने करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात वाहन चालवितांना अनेक जण निष्काळजीपणे वाहन चालवून स्वत:चा व अन्य व्यक्तिंचा जीव धोक्यात घालत असतात. त्यामुळे असे अपघात भविष्यात होऊ नये यासाठी शालेयस्तरावर रस्ता सुरक्षा नियमांची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. यासाठी सर्व विभागासह विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. जनआक्रोश, नागपूर ही संस्था रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन करत असून त्यांच्या या संस्थेत सर्व नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.कासलेकर म्हणाले की, 80 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याने हे अपघात कमी करण्यासाठी नागरीकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. कुठलीही दुर्घटना ही विदारक असते, ती टाळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगून जनआक्रोश संस्थेचा प्रमुख उद्देश हा नागरीकांचे प्रबोधन करणे असल्याचे सांगितले. अजय परमान यांनी नागरीकांनी दूचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालवितांना सिट ब्लेटचा वापर करावा. वाहन ओव्हरटेक करु नये, वाहन चालविताना प्रत्येकाने स्वत:बरोबर इतरांचाही आयुष्यांचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. प्रकाश खांडेकर यांनी वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, वाहतुकीचे नियम पालन, रस्ता सुरक्षा संदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण केले. या कार्यशाळेस मोठया संख्येने नागरिक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.