जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांवर शिक्षक भरती करा: बिरसा फायटर्सची मागणी
मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन
नंदुरबार:नंदुरबार जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांवर मानधन तत्त्वावर स्थानिक शिक्षकांची नेमणूक करा,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आंतरजिल्हा,जिल्हांतर्गत, सेवानिवृत्त व अन्य कारणांमुळे नंदुरबार जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली आहेत. काही शाळांत फक्त एक शिक्षक कार्यरत आहे,तर 300 ते 400 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या काही शाळांत शिक्षकांची 4 ते 5 पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता नंदुरबार जिल्हा परिषदेने मानधनावर तात्पुरत्या शिक्षकांची भरती करण्याचे निश्चित करावे.
रत्नागिरी जिल्ह्यात 700 रिक्त पदांवर मानधन तत्त्वावर 700 शिक्षक भरण्यात आले आहेत. त्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,म्हणून जिल्हा परिषदेने 9 हजार रूपये मानधन तत्त्वावर रिक्त पदांवर शिक्षकांची नेमणूक करण्याची अत्यंत गरज आहे.रिक्त पदांवर त्याच गांवातील D.ed(DT.ed),B.ed पात्रताधारक उमेदवारांनाच मानधन तत्त्वावर शिक्षक म्हणून तातपुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात यावी.
तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाकण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक पात्रताधारक उमेदवारांची शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,नंदुरबार तालुकाध्यक्ष किसन वळवी,नंदुरबार प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,कोषाध्यक्ष हिरामन खर्डे ,रोझवा शाखाध्यक्ष बारक्या पावरा,वडगावचे अध्यक्ष राहूल चव्हाण, गंगानगरचे शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी आदि 22 पदाधिकारी उपस्थित होते.