रामपूर, ता. अक्कलकुवा येथील घरकुल घोटाळ्यातील आरोपी यांचेवर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने दि.18 जुलै रोजी अक्कलकुवा येथील तहसिल कार्यालया समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी तहसीलदार रामजी राठोड यांना दिले आहे.

प्रतिनिधी | अक्कलकुवा

*मौ. रामपूर, ता. अक्कलकुवा येथील घरकुल घोटाळ्यातील आरोपी यांचेवर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने दि.18 जुलै रोजी अक्कलकुवा येथील तहसिल कार्यालया समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी तहसीलदार रामजी राठोड यांना दिले आहे.
आमदार आमश्या पाडवी यांनी तहसीलदार रामजी राठोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौ. रामपूर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथे मूळ आदिवासी लाभार्थी यांच्या नावे मंजूर घरकुलचा लाभ हा इतरांच्या बँक खात्यात दिला गेला तसेच अनेक मंजुर पात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळून त्या जागी दुसऱ्या अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट केले गेले असल्याचे मी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार झालेल्या चौकशी अंती अनेकांवर दोष निश्चिती करण्यात आली परंतु या प्रक्रियेत मुख्य भूमिका असणारे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक, गट विकास अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांचेवर मात्र वरदहस्त ठेवत त्यांना सर्व कारवाईतून दूर ठेवण्यात आले तसेच मूळ लाभार्थी यांना अद्याप पर्यंत मंजूर घरकुल अनुदानाचा लाभ देण्यात आलेला नाही. या सर्व सुमारे 03 वर्षाच्या कार्यकाळात लाभा पासून वंचित असलेल्या मूळ लाभार्थी यांच्या पैकी 04 लाभार्थी यांचा मृत्यू देखील झाला आहे. ही बाब ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या देखील निदर्शनास आणून दिली तरी अद्याप पर्यंत या वर कोणतीच ठोस कार्यवाही न करता केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत.असे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे, ही बाब अत्यंत निंदाजनक असून या प्रकरणात दोषी असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी मृतांच्या परिवाराची तसेच समस्त आदिवासी समाजातून होत आहे. सदर मृतांच्या कुटुंबीयांनी संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज देखील दिला आहे. तरी, देखील मौ. रामपूर ता. अक्कलकुवा येथील घरकुल घोटाळ्यातील सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी यांचेवर तथा त्यांचेवर अद्याप ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत घोटाळ्यास अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नंदुरबार यांचेवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे येत्या 07 दिवसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद न झाल्यास तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता तरी देखील अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसुन उलट मयतांच्या वारसांना त्रास देण्याचा प्रकार सुरु असुन त्यामुळे जनतेचा रोष वाढत आहे. जनतेचा रोष पाहता वंचित लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी दि. 18 जुलै रोजी अक्कलकुवा तहसिल कार्यालया समोर सकाळी 11 वाजता मयतांचे वारसदार व वंचित लाभार्थी यांच्या सोबत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रस्ता रोको आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असा इशारा ही शेवटी आमदार आमश्या पाडवी व घरकुला पासुन वंचित लाभार्थ्यांच्या वारसदारांनी दिला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!