शेतीच्या वादातून झालेल्या तुफान हाणामारीत 2 जणांचा मृत्यू ५ जण जखमी, परस्परा विरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी =नरेश शिंदे

शहादा, ता. 27: मलगाव ता. शहादा शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. हा वाद एवढा विकोपाला गेला की त्यातून थेट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात पिता व पुत्र असे दोन जण ठार झाले तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या ताफा घटनास्थळी दाखल झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या मलगाव गावाजवळील (ता.शहादा) शिवारातील पिपल्यापाडा येथे एकाच कुटुंबातील दोन गटातील भाऊबंदकीमध्ये शेत जमिनीच्या वाद होता. यातून आज दोन्ही गटात शेतातच वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला जाऊन त्याचे थेट हाणामारीत रूपांतर झाले. या हाणामारीत तलवारी, धाऱ्या, विळा, लाकडी दांडके, आदी हत्यारांचा वापर करण्यात आला. हाणामारी एवढ्यावरच न थांबता थेट गावठी पिस्तूलातून दोन राउंड फायर करण्यात आले. या गोळीबारात अविनाश सुकराम खर्डे (वय २६) रा. मलगाव (ता. शहादा) हा अविवाहित तरुण जागीच ठार झाला तर त्याचे वडील सुकराम कलजी खर्डे (वय ५४) यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर रायसिंग कलजी खर्डे (वय५४), गणेश दिवाण खर्डे (वय २४), रामीबाई दिवाण खर्डे सर्व रा. मलगाव (ता. शहादा), सुनील राजेंद्र पावरा (वय २३), अरुण राजेंद्र पावरा दोघे रा. बेडीया (ता. पानसेमल, मध्यप्रदेश) आदी पाच जणांचा जखमीमध्ये समावेश आहे. यात मयत अविनाश खर्डे यांचे काका रायसिंग कलजी खर्डे यांची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेत १४ आरोपींचा समावेश असून शहादा पोलिसात दोन वेगवेगळ्या फिर्यादी झाल्या आहेत. त्यात देवेसिंग रायसिंग खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुनील राजेंद्र पावरा, गणेश दिवाण खर्डे, सोनीबाई गणेश खर्डे, अरुण राजेंद्र पावरा, ललिताबाई राजेंद्र पावरा, रमीबाई दिवाण खर्डे यांनी शासकीय जमिनीचा मालकी हक्कावरुन फिर्यादी देवेसिंग खर्डे यांचा शेतात वरील आरोपींनी आमच्या शेतात निंदनी का करतायेत असे सांगितल्याचा राग येऊन तलवार, विळा व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. सुनील पावरा याने गावठी कट्ट्याने फिर्यादीचा भाऊ अविनाश याचा छातीवर गोळी मारुन जागीच ठार केले व काका सुकराम खर्डे यांच्यावरही गोळी झाडून गंभीर जखमी केले. म्हणून वरील सहाही आरोपींविरुद्ध कलम ३०२ अन्वये खुणाच्या गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपोनि नितीन पाटील करीत आहेत. तसेच सोनीबाई गणेश खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुकराम कलजी खर्डे, अविनाश सुकराम खर्डे, रायसिंग कलजी खर्डे, ममता सुकराम खर्डे, शकुंतला रायसिंग खर्डे, देविदास रायसिंग खर्डे, निलेश रायसिंग खर्डे, जगदीश रायसिंग खर्डे (सर्व रा. मलगाव) या आठही आरोपींनी फिर्यादीचा शेतात जमिनीवर कब्जा करण्याचा उद्देशाने अनधिकृतपणे प्रवेश करून वाद घालून लोखंडी सळी, लाकडी डेंगारे व लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून वरील आरोपींविरुद्ध कलम ३०७ अन्वये व दंगलीच्या गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!