,साकळी येथे कानबाईचा उत्सवात केळीच्या खोडांपासून आकर्षक सजावट
गोकुळ कोळी
मनवेल ता.यावल- साकळी येथे सालाबादाप्रमाणे खान्देशचे दैवत कानबाई- राणूबाईचा उत्सव आज दि.२७ रोजी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी सर्वत्र धार्मिकतेचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते.
जुन्या अख्यायिका नुसार,दीड प्रहरासाठी माहेरी येत असलेल्या कानबाई- राणूबाई या देवतेच्या उत्सव श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा करण्याची फार जुनी प्रथा आहे. आपल्या सासरहून दिड प्रहरासाठी (दिड दिवसासाठी) कानबाई- राणूबाई आपल्या माहेरा येत माहेरपणाचा आनंद मनमुराद घेत असतात.या उत्सवाला रोटाचा उत्सव सुद्धा म्हणत असतात.
या दिवशी घरोघर सर्व भाऊबंध एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.देव्हाऱ्याजवळ केळीखांब,फुलां-पानांची तसेच इतर सजावटींच्या साहीत्यांनी या उत्सवाची आकर्षक सजावट करतात व विधिवत कानबाई- राणूबाईची स्थापना करतात.या देवतेची या दिवशी
सांयकळी पूजा अर्चा करून आरती करतात. त्यानंतर पुरणपोळी व खिरीचा नैवेद्य दाखवितात.नामस्मरणाने देवतेची मनोभावे आराधना करतात. हा उत्सव म्हणजे महिलांच्या आनंदाची पर्वणी असते.
या उत्सवादरम्यान साकळी येथील प्रसिद्ध डॉ.व्ही.सी.वाणी(बाबा डॉक्टर), यांच्या केळीच्या झाडांच्या साहीत्यापासून आकर्षक सजावट करण्यात आलेली होती.या सजावटीतून आपल्या जिल्ह्यात मुख्य व प्रसिद्ध असलेल्या केळी पिकाचे महत्त्व अनोख्या पद्धतीने दाखवण्यात आलेले होते.केळीची पाने,पानांसहित खोडे,कंबळ, केळीची फण्या, केळीचे घड या सर्व पर्यावरण पूरक साहीत्यां वापर करून आकर्षकपणे सजावट करण्यात आलेली होती.या सजावटीमुळे वाणी यांच्या घरी मंगलमय वातावरण निर्माण झालेले होते.तर या सजावटीची गावात सर्वत्र चर्चा होती.