दादाभाई पिंपळेच्या लेखणीतून
*"निजलेला पॅंथर"*
*तो आजकाल खूपच बिझी रहायचा..... त्याला अजिबात फुरसत नव्हती.शनिवार रविवार तर त्याला थकवा घालवण्याचाच वार वाटायचा.....तसा पगार त्याचा भरपूर झाला होता. परंतु वाढत्या पगाराबरोबर त्याने कुटूंबाच्या गरजा सुद्धा वाढवून घेतल्या होत्या.अगोदर भाड्याच्या दहा बाय वीसच्या घरात रहायचा तेव्हा तो गुलामगिरी,ब्राम्हणाचे कसब,शेतकऱ्यांचा आसुड, सत्यधर्म, सत्यशोधक, हिंदू कोड बिल, जातीव्यवस्था,शुद्र पूर्वी कोण होते?, कार्ल मार्क्स आणि भगवान गौतम बुद्ध,मुक्ती कोण पथे?, बहिष्कृत भारत,मुकनायक,कबीराचे दोहे,बसवेश्वराची वचने, विद्रोही तुकाराम,मा.म.देशमुख सरांचे साहित्य, संत चक्रधर स्वामींचा सनातन्यांवर प्रहार, पेरियार रामास्वामी,शाहू महाराज, शिवाजी महाराज,ते आतापर्यंतच्या सर्व माणूस घडवणाऱ्या महापुरुषांच्या व त्यांच्या साहित्यावर अभ्यास करून तो समाजात ते विचार रुजवण्यासाठी रात्र रात्र भर फिरायचा.हळूहळू तो व्यवहाराने मॅच्युअर झाला ? आणि त्याने एच डी एफ सी,आय सी आय सी आय सारख्या घरासाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून चांगल्या वसाहतीत बंगला बांधला होता .घराला पीओपी करुन विविध रंगछटांनी स्वत:चे घर एलईडी बल्ब लावून सजवले होते.घरात खोका टीव्ही बदलून बजाज फायनान्सने मोहित केलेल्या शून्य टक्के व्याजदराच्या स्किमने घेतलेल्या कर्जाने छप्पन इंची भिंतीत खुपसायचा टीव्ही लावून घेतला होता.मस्तपैकी एअरटेलचे डीश बसवून दोनशेच्या वर चॅनलचा पॅक मारला होता.त्याची बायको विविध सिरीयल बघून एकलकोंडी होत होती ? तर तो टीव्ही समोर बसून बातम्या बघायचा आणि फक्त हळहळ व्यक्त करायचा.त्याची मुलं उच्चशिक्षण घेऊन घरीच मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसायची..... त्याला उपाशीपोटी मरण येईल त्याच्या अगोदरच आरक्षणाच्या जोरावर सरकारी नोकरी लागली होती..... परंतु त्याची मुलं आता मी सर्वसाधारण मधून डिग्री मिळवल्याच्या डिंग्या हाणत होते.ज्यावेळेस तो नोकरीला नव्हता तेव्हा तो संविधान, बाबासाहेबांच्या खंडावंर अभ्यास करायचा.नामदेव ढसाळ त्याला खूप जवळचा वाटायचा.गोलपिठा म्हणजे साहित्याचा अप्रतिम ठेवा असं तो ठणकावून सांगायचा.आण्णाभाऊ साठे,अमर शेख,फातिमा आई,कबीर ,सावित्रीमाई, रमाई यांच्या कहाण्या सांगतांना तो अक्षरशः रडायचा.चळवळच दलित, आदिवासी ,वंचित श्रमिक कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर कामगार यांना जिवंत ठेवू शकते असं म्हणून मोर्च्यात, व्याख्यानात व आंदोलनात तो अग्रभागी असायचा.*
*जसजसा काळ बदलत गेला तसा तो आता नोकरीत मिळणाऱ्या पैशाने धनिक वर्गात मोडत होता.....गरीब नातेवाईक त्याच्या बायकोला आणि त्याच्या लेकरांना नकोसे वाटत होते..... हळूहळू मार्क्सचा वर्गवाद सिद्धांत भिलाटीत आणि महारवाड्यातही जोर धरत होता..... नोकरी लागून तयार झालेला श्रीमंत व उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार असणारा गरीब यांच्यातील सामाजिक दरी दिवसेंदिवस वाढत होती..... त्याने अलिकडच्या काळात नाईन्टी मारणाऱ्या उच्चभ्रू समाजातील लोकांसोबत बरीच बैठक जमवली होती.आता त्याला जिंदगी म्हणजे ऐश करण्यासाठी असते असे समजून तो स्वतःच्या आणि त्याच्या बायको पोरांच्या मौजमजांवर लक्ष केंद्रित करत होता.तो आता चारचौघांमध्ये बाबासाहेबांचे चित्र रंगवून सांगतांना म्हणायचा "बाबासाहेबांनी अप टू डेट रहायला सांगितले आहे".म्हणून मी महागडे आणि ब्रॅंडेड कपडे वापरतो.....*
*तो ज्या वेळेस ऐश करायला लागला त्याचवेळेस येथील विषमतावादी विषाणू प्रबळ होत होते.विषाणूंना कळून चुकले होते की, पॅंथर आता लाभार्थी झाला आहे.पंख्याच्या हवेत तो थंडगार आणि निपचित पडला आहे.तेव्हा विषाणूंनी संपूर्ण देशात आपली पाळेमुळे रुजवली होती. आरक्षणाच्या विरोधात आंदोलने व्हायला लागली,खाजगीकरणाची वारे वाहू लागली, खनिज संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट सुरु झाला.उदात्तीकरणाच्या नावावर घरे,वस्त्या, संस्कृती यांच्यावर आक्रमण व्हायला लागले..... भारतीय संविधानानेच दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत विषाणूंचे विष जनमानसांच्या नसानसात भिनले गेले.....सरकारे बदलायला सुरुवात झाली खाजगीकरण उदारीकरण व जागतिकीकरण ह्या धोरणाचा अवलंब व्हायला लागला तरी तो स्वस्थच होता..... अनेक वर्षापासून कार्यरत असलेले विषमतावादी विषाणू या देशातील यंत्रणेलाच गिळंकृत करतील हा विचार सुद्धा त्याने केलेला नव्हता.परंतू ते सत्ता बदलत गेली आणि जनतेच्या हिताचे कायदे बदलायला सुरुवात झाली.त्यांनी बदललेल्या कायद्याच्या बातम्या टीव्हीवर ऐकून हा अस्वस्थ होत होता.त्याला माहिती होते की,मोर्चे आंदोलने करून सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडता येते.मात्र त्याला आता ऊन्हाळ्याचं ऊन सहन होत नव्हतं ?.पावसाळ्यात ओलं झाल्यावर व्हायरल इन्फेक्शन होत होतं ? आणि हिवाळ्यात थंडीमुळे सर्दी होत होती.....? आता कसं करावं.....?.*
*रस्त्यावर काही बोटावर मोजण्याइतकीच माणसे माणूस वाचवण्याच्या घोषणा देत बाजारपेठेत फिरताना त्याला दिसायची..... मात्र तो सामील व्हायचा नाही.त्याचं कारणही अजबचं होतं.....!*
*मला त्यांनी बोलावलं नाही ! आणि मी बोलावल्याशिवाय जाणार नाही हे मुख्य कारण*
*म्हणजे तो मोठा माणूस होता त्याला निमंत्रणाची गरज वाटायला लागली.*
दुसरं कारण म्हणजे
मला कोणी घोषणा देतांना बघितलं तर…..माझी नोकरी जाईल की काय? ही भिती त्याच्या मनात होती ?
आता त्याचं तोंड शब्द बाहेर काढण्याच्या लायकीचं नाही हे त्याला कळत होतं ?
आणि तिसरं कारणं सगळ्यात महत्त्वाचं होतं…..
ज्या बंगल्यात त्याची राणी रहात होती तिला त्याने कधी बाजार दाखवला नव्हता…..धुणीभांडी व शैय्यासोबत याच्याव्यतिरिक्त त्याच्या राणीवर त्याने काही एक जबाबदारी सोपवली नव्हती ?.
म्हणून त्याचा जीवनाचा प्रवास सरकारी हमालापासून कौटुंबिक घरगड्यासारखा अविरत सुरू होता.
किराणा आणायची जबाबदारी त्याचीच.
पाच रुपयाची कोथिंबीर आणायची जबाबदारी पण त्याचीच
काळ्या पिशवीत रविवारी मटण आणायची जबाबदारी पण त्याचीच.
त्याच्या राणीचे मेकअपचा सामान व आंतरवस्त्र आणायची जबाबदारी पण त्याचीच.
घरी उच्च शिक्षित मुला मुलीचे शिक्षणाचे कागदपत्रे पासून तर सगळी जबाबदारी याने स्वतःवर घेतली होती.त्यामुळे तो पुरता भारवाहू बनला होता.
मग देशात, समाजात काहीही होवो त्यासाठी त्याला वेळच मिळत नव्हता.
मणिपूरमधील आया बहिणींची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार झाले तो मनातून हळहळत होता.मात्र पोटापाण्यासाठी त्याने केवळ आणि केवळ नोकरी हेच लक्ष्य ठेवल्यामुळे तो पुरता सरकारी गुलाम झाला होता……
आग हळूहळू सगळीकडे लागत होती.परंतु त्याला कळत नव्हते की,आग त्याच्या घराजवळ येऊन पोहचली आहे…..
झोपेतच त्याची आसवे आपोआप गळायला लागली होती ?
आणि अचानक आमावस्येचा काळ्याकुट्ट अंधाराच्या रात्रीत तो मांडीवर थाप देऊन स्वप्नात ओरडला…..
जिंदाबाद ! जिंदाबाद !! जिंदाबाद.!!!
मी ताडकन उठलो ऐकलं तर पॅंथरची डरकाळी होती.
मला खूप आनंद झाला ! कारण तो जागे झाला म्हणजे आम्ही एकत्रितपणे लढणार आणि एकत्रित लढलो म्हणजे शंभर टक्के जिंकणार…..!
या विश्वासासह
चला मग आपणही या लढाईत सामील व्हा.
देश बचाव,मानव बचाव
जयभिम ! जिंदाबाद !! लाल सलाम !!!