*दादाभाई पिंपळेच्या लेखणीतून…..* *व्हॅलेंटाईन डे* *आता तो एकटाच खिडकीजवळ बसून एकटक आकाशाकडे बघत असायचा.कधी कधी जमीनीच्या समांतर नजर रोखून शरीराची हालचाल न करता तासंतास बसून असायचा.* *कोणी त्याला बघितले तर असे वाटायचं की मानवी देहाच्या रुपात पुतळाच बसलेला आहे.* *त्याच्या घराच्या समोरच त्याने दोन कडूनिंब, एक पिंपळ व एक वडाचे झाड लावले होते…..वडाच्या झाडाला वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनींनी गुंडाळलेला धागा सकाळच्या कोवळ्या परंतु सोनेरी उन्हात चमकदार दिसत होता.जणू सुवासिनींच्या सात जन्माची बुकींग झालेल्याची ती निशाणी होती.* *त्याच्या मनातही तिच्या गोड आठवणींनी उधाण घ्यायला सुरुवात केली होती.तिच्या आठवणींच्या उधाणीत तो त्या वडाच्या झाडाच्या अवतीभोवती फेऱ्या मारत असायचा.व शोधायचा की,माझ्यासाठीचा धागा कोणता होता?* *त्याच्या निवासाची जागा म्हणजे ताजमहल तर नाहीच ! परंतु त्यांच्या दोघांच्या संसाराची अप्रतिम आठवण म्हणून त्याने मध्यमवर्गीय माणसाच्या ऐपतीप्रमाणे सुंदर असे घर बांधले होते.* *त्या घरात दोघांनी मिळून अनेक स्वप्ने सजविली होती. स्वप्ने दोघांचीच परंतु आज तो उघड्या डोळ्यांनी एकटाच, ती स्वप्ने घराच्या व्हरांड्यात बसून बघत होता…..* *विचारांच्या गर्त छायेत बुडाला असतांनाच भूतकाळातील गोड आठवणीत तो रममाण झाला होता.* *असं म्हणतात की ,”व्यवहारात यशस्वी व्हायचं असेल तर भूतकाळातील आठवणीत माणसाने गुंतू नये” ? मात्र हे तत्त्वज्ञान त्याला लागू पडत नव्हते.* *त्याला जगण्यासाठी केवळ तिच्या आठवणी कामात येत होत्या…..!* *त्याच्या एकाकी जिवनात खाण्या पिण्याची सहानुभूती अनेक लोक दाखवत होते. मात्र मनाला भक्कम करणारे शब्द अजून कोणीही त्याच्या साठी तयार करु शकले नव्हते.* *मनावर मोठे ओझं ठेवून तो जगत होता. आणि या जगण्यात किती आनंद व अमर्याद दुःखाची कल्पनाही कोणाला येऊ देत नव्हता……* *तो विचारात गर्क असतानाच त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका चिमुकल्या मुलीने त्याला हाक मारली आणि तो भानावर आला.* *ती चिमुकली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती म्हणून सर्व प्रकारचे “डे” तिच्या शाळेत साजरे व्हायचे* *तिने एक गुलाबाचे फुल त्याच्या हातात देतांना “हॅप्पी रोझ डे” डियर असं चेहऱ्यावर चमचमणारे भाव आणले. गालावरच्या दोन्ही खळ्यांना मागे ओढत गोड हास्य करत ती चिमुरडी पुटपुटली…..* *गुलाबाचे फुल हातात देत त्या चिमुरडीने त्याला परत भूतकाळाच्या गर्त खाईत नेले.* *त्या चिमुरडीच्या हास्याने त्याच्या विचारांची चक्रे अधिक वेगाने भूतकाळातील आठवणीत त्याला घेऊन गेली.आणि एखादा चलचित्रपट चालावा तसा चित्रांचा समुह त्याच्या डोळ्यासमोर फिरु लागला…..* *तसा तो काही खूप धनदौलत वाला नव्हताच ! परंतु त्याला बऱ्यापैकी सरकारी नोकरी लागलेली होती.त्याचे बाबा ह्रदयविकाराच्या झटक्याने दोन वर्षांपूर्वीच गेले होते.बाबांनी आख्ख आयुष्य मजुरीत काढलेलं,त्याच्या मायनेसुद्धा अठरा विश्व दारिद्रयात घालवलेले….. त्यामुळे मायची स्वप्ने पूर्ण होवोत यासाठी तो आटापिटा करत होता.मायच्या स्वप्नातीलच एक स्वप्न म्हणजे त्याचं लगीन…..!* *तसं त्याचं वय वीस वर्षाचचं……परंतु सरकारी नोकरी लागलेली होती त्यामुळे मायने त्याच्या भाकरी कोण करणार ? अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली.आणि लग्नासाठी वधू मुलगी शोधण्याची तयारी केली. खरं म्हणजे त्याच्या मायलाही वरमाय म्हणून मिरवून घ्यायचं होतं.म्हणून मायने एक-दोन नातेवाईकांना त्याच्या लगीन बाबतीत कानावर घातलं होतं.* *नशीबाच्या रेशीम गाठींना कोणीच बदलू शकत नाही ? असे वारंवार त्याची माय त्याला सांगत असायची.* *जवळच्या नातेवाईकांनी तपासतुपास करून हाकेच्याच अंतरावर असलेल्या गावातील मुलीशी त्याची रेशीम गाठ बांधायची निश्चित केली होती….. तसं त्या मुलीचं वय लग्नाचं नव्हतंच परंतु खेड्यागावात मुलीचं लग्न लवकर लावून मायबाप जबाबदारीतून मुक्त व्हावे अशा धाटणीचे म्हणून तिचं लगीन त्याच्याशी निश्चित करायचं ठरलं …..* *साधारणतः चौदा पंधरा वर्षांची मुलगी त्याची नियोजित वधू म्हणून निश्चित करण्यात आली होती….. गाल गोबरे गोबरे, दिसायला गोरी गोमटी, छोटंसं पण तिच्या चेहऱ्यावर शोभून दिसणारं नाक, आणि शरीर यष्टीने गच्च भरलेली…..!* *त्यालाही माहीती होतं की त्याची माय निर्णय घेतांना चुकत नाही म्हणून ! …..त्याने लग्नासाठी होकार दिला.त्याचं लगीन अतिशय धुमधडाक्यात झालं. पावणे रावळे येणं जाणं सुरूच होतं.त्यालाही वाटत होतं की, कधी एकदाचं पावणे रावळ्यांचं येणं जाणं थांबेल.* *त्याच्या मायने नवस केला होता. तो नवस फेडण्यासाठी नातेवाईकांची रेलचेल सुरूच होती.* *दरम्यान तो चोरून चोरून नववधूकडे बघत होता आणि स्मित हास्य करत होता…..* *त्यावेळेस फ्लाईंग किस वगैरे या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रचलित नव्हता.* *त्याची नववधूही चोरून चोरून त्याला बघायची. दिवस कसे आनंदाने मात्र कधी जवळ येऊ अशा आशेने जात होते. मायने केलेला नवस फिटला तसा सासूबाईंनी पण देवीवर कोरं जोडपं आणण्याचा नवस केलेला होता. त्यामुळे अजून काही दिवस कोरे कोरेच गेलेत…..बघता बघता सव्वा महिना लोटला.* *ते दोघं एकमेकांना बघण्यातच दंग होते ? या सव्वा महिन्यात त्यांच्या शरीराचे मिलन म्हणून फक्त एकमेकांच्या हाताला केवळ दोनदाच स्पर्श झालेला होता…..* *तो म्हणजे खान्देशातील लग्नाच्या चालिरीतीतली शेवटची रीत म्हणजे “हळद कांकण फेडायचे” (मुक्या टाकणे)….. अर्थात नवरा नवरी हातात बांधलेली घोंगडीची कांकणं, मोठ्या पातेल्यातील पाण्यात टाकून सापडवितात.त्यावेळेस त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला होता. आणि दुसरा म्हणजे तिच्या आईने दोघांना देवीचा गड चढतांना हातात हात घ्यायला सांगितला होता. हेच ते दोन स्पर्श त्याने आपल्या ह्रदयात कोरूनपण आणि जपूनपण ठेवले होते…..!* *असं जरी असलं तरी त्याला तिला ह्रदयाशी जोडून घ्यायचं होतं म्हणून तो संधीची वाट पहात होता.* *हळूहळू सर्व रितीरिवाज, विधी पूजा संपलेल्या होत्या.आता घरात तो, त्याची नववधू व त्याची माय तिनचं लोक होते.त्याला तिच्याजवळ व्यक्त व्हायचं होतं.परंतू तिला तेवढी समज नसल्याने ती त्याची माय जसं सांगायची तसं ऐकत होती.* *खान्देशातील लहान पणापासून घरातले संस्कार म्हणजे सासू -सासरे सांगतील ते ऐकायचं…..?* *मग या ऐकण्याच्या संस्कारात नवरा येत नाही का?असा प्रश्न त्याच्या मनात नेहमीच उत्पन्न होत असायचा.* *ती दिवसभर त्याच्या मायबरोबर कामात व्यस्त असायची आणि रात्री न सांगता झोपी जायची.तो दोन बुकं शिकलेला असल्याने तिच्याबरोबर खूप बोलावं, प्रेमाच्या दोन गोष्टी कराव्यात असं दररोज ठरवायचा.परंतू बोलणं व्हायचं नाही.त्याच्या मनात असलेली घालमेल त्याच्या मायला कळत होती…..मात्र तिचं वय कमी असल्याने त्याची माय खबरदारी घेत होती.* *एके दिवशी माय गुजरीत गेली असतांना त्याने तिला घरातच गाठली आणि रुबाबात म्हणाला…..तू बायको आहेस माझी !…..* *ती निरागसपणे बोलली….. मग मी काय करू ?* *त्याने डोक्याला हात लावला व रागात म्हणाला…..माझी आरती उतार !* *ती लगेच म्हणाली….. ठीक आहे मग मी आरतीचं ताट करते !…..* *त्याला खूप राग आला नी त्याने तिच्या कानशिलात लगावली. ती रडायला लागली तसा तो भांबावला…..कारण त्याची माय सुद्धा तापट स्वभावाची होती.आणि तिने जर आपल्या मायला ही गोष्ट सांगितली तर आपली पंचायत होईल म्हणून तो तिला समजावू लागला.तिला समजावण्याच्या सुरातच त्याने तिला छातीशी घट्ट धरले.त्याच्या ह्रदयातली धडधड तिच्या कानांवाटे थेट तिच्या हृदयापर्यंत पोहचली आणि तिच्याही ह्रदयातली धडधड वाढली…..* *या धडधडीतच त्यांच्या प्रेमाचा अंकुर फुलू लागला. तिचे रडणं थांबवतच त्याने घडलेला प्रकार मायला न सांगण्याच्या अटीवर तिला शपथ घातली.त्याच्या मनात तिच्या बाबतीत द्विधा मनस्थिती होती.मात्र त्याच्या हृदयातल्या धडधडीने तिला नवरा-बायकोच्या नात्यातली आनंदीमय चाहूल लागली होती.* *प्रेमाची व्याख्या,संज्ञा, वगैरे या गोष्टी तिच्या जिवनात कधीच डोकावल्या नव्हत्या परंतु त्याच्या हृदयातल्या धडधडीने न बोलता तिला प्रेमाची व्याख्या कळाली होती.माय गुजरी मधून भाजीपाला घेऊन घरी परतली होती.त्याच्या मनात शंका होती की, घडलेला प्रकार ती मायला सांगेन.परंतू माय घरात आल्यावर तिने त्याच्याकडे बघत स्मित हास्य केले.आणि मायच्या हातातून भाजीपाला घेतला. आज तिच्या हास्यातलं वेगळेपण त्याला जाणवलं होतं.पहिल्यांदा त्याच्या मनात काहूर उठलं होतं.या काहुरात दररोज पेक्षा आज ती जास्त सुंदर भासत होती.* *मायने दोघांकडे आळीपाळीने डोळ्यांच्या भुवया फिरवल्या .मायला जाणीव झाली की माझ्या गैरहजेरीत दोघांच्या प्रेमाचा अंकुर फुलला आहे.म्हणून तिने त्या दोघांना एकांत मिळावा या हेतूने शेजारच्या घरी काम आहे असा बहाणा करुन घरातून बाहेर पडली.* *हे दोघच घरी परंतू दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. तो बाहेर ओट्यावरच्या खाटेवर बसला व ती दारातच खाली मान घालून बसली होती.त्याला तिच्याशी बोलावं असं वाटतं होतं. मात्र माय कधी घरात येईल याचा नेम नव्हता म्हणून तो खाटेवरून उठला नाही.आणि ती सुद्धा दारातच बसून होती…..* *बराच उशीर झालेला पाहून त्याने तिला पाणी आणायला सांगितले…..तिने मुकाट्याने पाणी आणले.पाण्याचा ग्लास हातात घेतांना त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या बोटांना झाला.ती लाजेने मान खाली घालत उभी होती.ग्लासभर पाणी पिऊन झाल्यावर त्याने तिला….. तुला तुझ्या आई वडीलांची आठवण येते का ? असा प्रश्न केला…..ती डोळ्यांत पाणी आणत म्हणाली हो फार आठवण येते…..मग जायचं का तुझ्या आईवडीलांकडे तो म्हणाला….. त्याच्याकडे बघत तिने मानेनेच नकार दिला. तिचा आईवडीलांकडे जाण्याचा नकार म्हणजेच त्याच्या विषयीची निर्माण झालेली ओढ असं काहीसं समीकरण त्याच्या मनात तयार झालं …..अप्रत्यक्षपणे तिने त्या दोघांच्या प्रेमाची पहिली कबुली दिली होती….. आणि त्यालाही तिच्या अशा वागण्याने बरे वाटले.* *लग्न म्हणजे शरीराचं आकर्षण असते असं अनेक महानुभावांनी आपल्या अनुभवातून अधोरेखित केले होते.त्याला सुद्धा शरीराचे आकर्षण होतेच ? मात्र वयाच्या सोळाव्या वर्षी तो चळवळीतील अनेक विचारवंतांच्या संपर्कात आल्यामुळे त्याची बायको म्हणजे त्याला केवळ एक शरीर म्हणून कधीच भासली नाही. शरीराच्या पलिकडेही स्री पुरुषाच्या नात्यामध्ये खूप काही असतं याची जाणीव त्याला होती.* *समाजातील सर्व चालीरितींचे भान ठेवत ठेवत त्यांच्या वैवाहिक जीवनाची गाडी चालली होती. लग्नाला दहा वर्षे लोटली होती.ते दोघंही खूप आनंदी होते.घरामध्ये कधी कधी वाद व्हायचे प्रत्त्येक वेळेस तो मायची समजूत काढून तिलाही छातीशी कवटाळून धीर द्यायचा.* *”जेवढं प्रेम तो तिच्यावर करायचा तेवढचं मायवरही करायचा”.* *मायने त्याच्यासाठी केलेले कष्ट कधीच त्याच्या डोळ्यासमोरून जायचे नाही.म्हणून मायला व तीला दोघींना त्याला कायम ह्रदयात सामावुन ठेवायचं होतं.मात्र या प्रयत्नात त्याची प्रचंड दमछाक व्हायची.कधी कधी दोघांचे निराश चेहरे बघून तो हताश व्हायचा.त्याची जगण्याची उमेद कमी व्हायची…..* *या निराशेतून ही हक्काचं ऐकणारी म्हणून तो कधी कधी तिच्यावर हातही उचलायचा.बरं तिला मारल्यावर माय कधीच खूष व्हायची नाही.उलट त्याची माय तो एकटा असतांना त्याला रागवायची व म्हणायची “तुझा बाप सुद्धा असाच होता रानटी! सारखा मला मारत रहायचा…..मेले पुरुषाची जातच विचित्र…..!* *मायच्या अशा बोलण्याने व वागण्याने त्याला कळायचेच नाही की,तो चूक आहे की बरोबर ?* *ती सुद्धा त्याच्या संसारात एवढी रममाण झाली होती की ….. संसार म्हणजे प्रेम ? की प्रेम म्हणजे संसार ? हे तिला समजण्यापलीकडे होते. ती कुठल्याही अपेक्षेशिवाय त्याच्या बरोबर आपले आनंदी दिवस काढत होती.* *त्यांच्या जोडप्याकडे पाहणाऱ्यांना असे वाटायचे की त्या दोघांनी जणू प्रेमविवाह केला असेल.कारण ते एकमेकांशी तसा संबंधच ठेवायचे.तिने अधिक खूलून जगावे म्हणून त्याने तिला सर्व प्रकारचे सहकार्य केले.दिवसेंदिवस ती अतिशय सुंदर दिसत होती. आणि तो तर जन्मजात कृष्णवर्णीयच होता ! त्याची माय सुद्धा त्यांच्या जोडीला राधाकृष्णाची जोडी म्हणायची…..* *त्यांच्या लग्नाच्या अठरा वर्षांनंतर मायने जगाचा निरोप घेतला होता…..* *आता त्यांच्या चुकांवर मार्ग दाखवणारी माय नव्हती.प्रेमाचा एक अध्याय संपलेला होता.मात्र जाता जाता त्याची माय तिला सगळ्या जबाबदाऱ्या सोपवून गेली होती…..या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत ते दोघं पार स्वत:ला विसरून गेले होते.* *एके दिवशी गुलाबाचं फुल घेवून आला नी गुडघ्यावर खाली बसुन तिला देत तो म्हणाला…..”आय लव यू”….. ती खूप लाजली आणि लाजत लाजत त्याला काय बेशरमपणा लावला असं म्हणाली.* *आय लव्ह यू चे उत्तर अशाप्रकारेच भेटेल ही त्याला पूर्ण शाश्र्वती होती.कारण दोन मुले झालीत . लग्नाला अठरा वर्षे लोटली आणि आज या रोमियोला आय लव्ह यू सुचत आहे असा विचार तिच्या मनात निश्चितच सुरू झाला होता….. मात्र त्याच्या मनातला आय लव्ह यू तर कुछ और होता ? आणि तो तिला कळत नव्हता.* *त्या रात्री त्याने तिला मिठीत घेतले.आजचं त्याचं वागणं बघुन ती सावधान झाली होती.तिच्या चेहऱ्यावरील भाव त्याच्याकडे बघतांना जणू “मस्तवाल बैलाकडे, एखाद्या भोळ्याभाबड्या गायीने बघावे” असेच होते…..* *ती त्याच्या बाहूपाशातल्या मिठीत लाडीक स्वरात म्हणाली…..काय चाललंय राजे ! गाडी रंगात दिसते आज ?…..तो अतिशय गंभीर होत तिला मिठीत घेऊन बोलला….. बघता बघता माय सुद्धा सोडून गेली…..आता मायची भूमिकाही तुलाच पार पाडावी लागणार आहे !…..* *त्याने तिला मिठीत घेऊन सांगितले की ….. तुला बघत आणि तुझ्या बरोबर जगत माझं मन भरत नाही…..**ती पण खूपच भावूक झाली आणि डोळ्यात अश्रू आणत म्हणाली…..यालाच म्हणतात की काय खरं…..”आय लव्ह यू” !* *दोघांचे डोळे आनंदाने भरून आले.गुलाबाचे फूल जरी प्रेमाचं प्रतिक असलं तरी ते प्रेम गंभीरतेकडे नेऊ शकतं याचा अनुभव ते दोघंही घेत होते.* *त्या आठवणीने तो अधिक गंभीर झाला आणि चिमुकली ने दिलेल्या गुलाबाच्या फुलाकडे बघून त्याच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या….. तो मात्र तसाच पुतळ्यासारखा बसून तिच्या आठवणीत रममाण झाला….. आणि खिशातून पाकिट काढत त्याने पाकिटातून तिचा फोटो काढला आणि म्हणाला…..* *”हॅप्पी व्हॅलेंटाईन डे”*
Related Posts
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याबाबत हल्लेखोर व त्यांच्या कथित सुञधारांवर ‘पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी व या घटनेचा निषेधार्थ शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याबाबत हल्लेखोर व त्यांच्या कथित सुञधारांवर ‘पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी…
सुनिता गांगुर्डे यांची सामाजिक बांधिलकी
सुनिता गांगुर्डे यांची सामाजिक बांधिलकी ————————————————-———नाशिक(गुरुनाथ तिरपणकर)-संध्याकाळी नेहमी प्रमाणे सुनिता गांगुर्डे या शहरातील एका मध्यवर्ती एरीयातु जात असताना एक फोर…
बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचा दसरा उत्सव रेल्वे प्रवाशांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.
बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचा दसरा उत्सव रेल्वे प्रवाशांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न. ———————————————————–बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-दसरा सण मोठा,आनंदाला नाही तोटा.रेल्वे मध्ये दस-याच्या आदल्या…