कंडक्टर तीन दिवसापासून बेपत्ता पण आढळला मृतदेह…एकच खळबळ

शहादा येथील सदाशिव नगरात राहणारे राजेंद्र उत्तमराव मराठे (वय ५३) हे राज्यपरिवहन महामंडळाच्या शहादा आगारात एसटी बसचे वाहक आहेत. दि.१३ मार्च रोजी राजेंद्र मराठे हे दुपारी चार वाजेच्या सुमारास किराणा घेवून येतो असे घरी सांगून गेले. शहरातील भाजी मंडईत असलेल्या एका किराणा दुकानावर त्यांनी किराणा वस्तूंची यादी दिली. परंतू तेथून वाहक राजेंद्र मराठे हे कुठे गेले हे कळाले नसल्याने ते गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता आहेत. कुटुंबियांसह नातलगांनी परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. अखेर शहादा पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली. त्यातच१६ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास डायल ११२ वर कॉल आला. तऱ्हावद ते नांदर्डे गावादरम्यान असलेल्या पुलाखाली एका पुरुषाचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत दिसत आहे असे सांगण्यात आले. त्या माहितीच्या आधारे शहाद्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुलाच्या खाली पोलिसांना जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तसेच परिसरात त्या मृतदेहाचे अवयव अन्य ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. हामृतदेह कोणाचा याचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. परंतू रात्री बराच उशिर झाल्याने पोलिस शहाद्याला परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेला पोलिसांनी घटनास्थळी जावून पुन्हा तपास सुरु केला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी घटनास्थळी करीत असतांना शहादा पोलिस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी हरविल्याची नोंद असलेली व्यक्तीचे वर्णन व मयताच्या उजव्या पायाचा अंगठा नातेवाईकांनी ओळखला. त्यामुळे जळालेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह हा तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले एसटी बस वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे अधिक तपासासाठी शहादा पोलिसांनी धुळे वैद्यकिय विभागाच्या पथकासह श्वान पथकालाही घटनास्थळी बोलविले. यावेळी वैद्यकिय विभागाच्या पथकाने घटनास्थळी मयताची पार्थिवाची शव चिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत मयताची मुलगी भावना राजेंद्र सरोदे (मराठे) यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारेकरी अनोळखीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!