*जिल्हादंडाधिकाऱ्यांचे तिखोरा पुलावरील वाहतूक बंदीचे आदेश, सर्व अवजड वाहतूक दोंडाईचा मार्गे केली; पुलाच्या दुरुस्ती संदर्भात आदेश केव्हा होतील अनभिज्ञ*
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी = नरेश शिंदे
अखेर दोन दिवसांपूर्वी तडे पडलेल्या तिखोरा पुलावरील सर्वच वाहनांची वाहतूक उद्या दि. 1 ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी त्या संदर्भात आदेश दिला आहे. खेतिया, शिरपूर आणि धुळेकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहतूक कुकरमुंडा, नंदुरबार, दोंडाईचा मार्गे वळविण्यात आली आहेत. तर प्रकाशाकडून शहादाकडे येणाऱ्या लहान वाहनांची वाहतूक प्रकाशा, काथर्दे, कलसाडी, पिंगाणे पुलावरून कुकडेल मार्गे शहादा करण्यात आली आहे. मात्र, बांधकाम विभागाला डामरखेडा आणि तिखोरा पुलाच्या तातडीच्या दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले असेल तरी काम कधी सुरू होईल याबाबत प्रश्नचिन्हच आहे. शहादा प्रकाशा रस्त्यावरील डांबरखेडा गावाजवळील पुलाचे काम सुरु असल्यामुळे सदर रस्त्याची वाहतुक ही 01 मार्च पासून तिखोरा पुलावरुन शहादा लोणखेडामार्गे वळविण्यात आली होती. सदर मार्गावरील सर्वाधिक वाहतुक ही अवजड वाहनांची असून गोमाई नदीवरील पुलावरुन खुप मोठया प्रमाणावर अवजड वाहतुक सुरु आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी या पुलाला तडे पडले. याची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तांत्रिक पाहणी केली. सद्यस्थितीत पुलाचे ॲप्रॉन वाहून गेले आहे. सदर पुलाची दुरुस्ती पुर्ण होईपर्यंत पूलावरील वाहतुक वळविण्याबाबतची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे संदर्भीय पत्राद्वारे केली होती. त्याला अनुशांगुन उक्त सदर मार्गावर काही अनूचित प्रकार घडून अपघात तसेच जिवित किंवा वित्तहानी होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा सार्वजनिक हित लक्षात घेवून 01 ऑगस्टपासून ते पुढील आदेश होईपर्यंत गोमाई नदीपुलावरील अवजड वाहतुक बंद करुन खालील प्रमाणे वाहतुक वळविण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी आज आदेशित केले. सदर मार्गावरील अवजड वाहने ही अक्कलकुवाकडून धुळेसाठी कुकरमुंडा, नंदुरबार, दोंडाईचा, धुळे (जाणे व येणे दोन्हीकडून) असा पर्यायी मार्ग, अक्कलकुवाकडून शिरपुरसाठी कुकरमुंडा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपुर (जाणे व येणे दोन्हीकडून) असा पर्यायी मार्ग तर अक्कलकुवा कडून खेतीयासाठी कुकरमुंडा, नंदुरबार, दोंडाईचा, शहादा मार्गे खेतीयाकडे (जाणे व येणे दोन्हीकडून) असा पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहेत. तसेच सदर मार्गावरील लहान वाहने ही प्रकाशा, कलसाडी, पिंगाणे पुलावरून कुकडेल शहादाकडे (जाणे व येणे दोन्हीकडून) असा पर्यायी मार्गाचा वापर करावयाचा आहे. सदर मार्गावर नंदुरबारचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नाशिक येथील राज्य महामार्गचे कार्यकारी अभियंता यांचे अधिनस्त यंत्रणेमार्फत दिशा दर्शक फलक आणि बॅरेगेटर्स लावण्यात येवून वाहतुक वळविणेबाबत आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार पथक नियुक्त करण्यात यावे. शहाद्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व राज्य महा, म.रा.र.वि.म., नाशिकचे कार्यकारी अभियंता यांनी सदर मार्गावरील दुरूस्तीचे कामे मुदतीत पुर्ण करावीत असे आदेशित करण्यात आले आहे. याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी दिले आहेत. मात्र, डामरखेडा पुलावरील वाहतूक बंद होवून पाच महिने झालेत तरी पुलाच्या देखभाल दुरुस्तीची काम अद्याप सुरू झालेले नाही. आता तिखोरा पुलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या पुलाच्या कामाचे आदेशित केले आले तरी ते कधी सुरू होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे नागरिकांना वेट अँड वॉचचीच भूमिका ठेवावी लागेल असे दिसत आहे.