बैल पोळा विशेष लेख

*बैल पोळा* ➖➖➖➖➖➖*ज्ञानपीठ*➖➖➖➖➖➖श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे “बैलपोळा”.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते.शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्हेने सजविण्यात येते.शेतकर्याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजत गाजत जातात व त्याला ‘अतिथी देवोभवो’ प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात.महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो.या सणास दक्षिण महाराष्ट्रात ‘बेंदूर’ असेही म्हणतात. 🙏🏻🙏🏻🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!