जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा कार्यान्वीत करण्यासह महिलांच्या सुरक्षीततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे बाबत शिवसेना उबाठा पक्षामार्फत निवेदनाद्वारे मागणी
….झुंजार क्रांती न्यूज नेटवर्क प्रतिनिधी. सुधीर गुरव नंदुरबार
नंदुरबार : पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर एका महिलेवर झालेल्या अत्याचारामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य परिवहन मंडळाचे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात चार प्रमुख आगार आहे. या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस व आवश्यक त्या उपाययोजना कार्यान्वित नसल्याचे आम्हाला प्रत्यक्ष भेटी दरम्यान निदर्शनास आले आहे. त्या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. चारही बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही सह अन्य सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी केली आहे. यावेळी नंदुरबार जिल्हा शिवसेना उबाठा पक्षामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनावर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, महानगरप्रमुख पंडित माळी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, विनोद चौधरी, वाहतूक सेना अध्यक्ष धारू कोळी, वाहतूक सेना उपाध्यक्ष छोटू चौधरी, जिल्हा सचिव दिनेश भोपे, शहर प्रमुख दादा कोळी, शहर संघटक अक्षय श्रीखंडे, रोहित मराठे, अयान खाटीक, निंबा पाटील, शहर प्रमुख राजधर माळी, शहर संघटक भक्तवत्सल सोनार यांच्या सह्या आहेत.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावरील मागण्या पुढील प्रमाणे….. सर्व बसस्थानकांवर अद्यावत तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही यंत्रणा कायम स्वरुपी कार्यान्वीत करण्यात यावी. विशेषतः रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महिला व पुरुष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे.महिलांसाठी बस स्थानकात स्वतंत्र प्रतिक्षालय कार्यान्वित करण्यात यावे. सर्व सुविधांसह हिरकणी कक्ष कार्यान्वित करावा, रात्रीच्या वेळी आगारात मुक्कामी असणाऱ्या बसेस लॉक करण्यात याव्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी माहितीदर्शक, दिशादर्शक फलक मोक्याच्या ठिकाणी माहितीसाठी लावण्यात यावे.उपरोक्त उपाययोजना महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याने त्या कार्यान्वित करण्याच्या सुचना आपण सर्व आगारप्रमुखांना द्यावे. महिलांच्या सरक्षिततेला प्राधान्य दिले जावे. अशी मागणी आम्ही आपणाकडे या निवेदनाद्वारे करीत आहोत. या निवेदनाची आपण गंभीरपणे दखल घेत तात्काळ प्रभावाने उपरोक्त सुचनांची अंमलबजावणी केल्यास भविष्यात स्वारगेट प्रकरणाची पुनरावृत्ती निश्चित टळू शकते.कृपया, सीसीटीव्ही यंत्रणेसह महिलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना कार्यान्वित करण्यात याव्या ही नम्र विनंती.