*महिला सक्षमीकरणात जिल्हा परिषदेचाही असा लाभला हातभार*
झुंजार क्रांती न्यूज नेटवर्क सुधीर गुरव नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील समस्त माता भगिनींना मानाचा नमस्कार आणि आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा! आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला लोकप्रतिनिधी नात्याने काही विचार आणि मुद्दे मांडावेसे वाटले म्हणून मुद्दाम हा लेख लिहीत आहे. केवळ महिला दिना च्या दिवशी स्त्रियांचे कौतुक केले जावे आणि इतर दिवशी मात्र त्यांना दुय्यम लेखले जावे; हे कोणत्याही शिक्षित महिलेला न पटणारी गोष्ट आहे. एक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून माझा देखील या गोष्टीला विरोध आहे. परंतु महिलांचे हक्क आणि महिलांनी प्रत्येक क्षेत्रात दाखवलेली प्रगत यावर ठोस विचारांची देवाण-घेवाण या दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र केली जाते ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. मला वाटते की, पुरुषा इतकीच महिला देखील सक्षम आहे; हे पटवून देण्याचे दिवस संपले आहेत. राजकारण, समाजकारण, शिक्षण, धर्म अध्यात्म, विज्ञान, संशोधन, क्रीडा यासह सर्व क्षेत्रात स्त्रियांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. पुराण काळापासून इतिहास काळापर्यंत आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत असंख्य नामवंत स्त्रिया घडून गेल्या. आदर्श अथवा आयकॉन म्हणाव्या इतक्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रियांची मोठी यादी आहे. त्या प्रत्येकीची कामगिरी गावागावातील प्रत्येक स्त्रीला ऊर्जा पुरवत असते आणि म्हणूनच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा गाजवणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीच्या रूपात तर कधी पोलीस वकील डॉक्टर शिक्षक या सेवकांच्या रूपात तर कधी बड्या अधिकाऱ्यांच्या रूपात स्त्रिया ठोस भूमिका निभावतांना दिसतात. जागतिक महिला दिनाच्या दिवशी विचार करताना निश्चितच माझ्यासारखीला याचा अभिमान वाटतो. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’; हे लक्षात घेऊन प्रत्येक सामान्य स्त्रीने पुढे जाण्यासाठी धाडसाने पाऊल टाकावे हा संदेश घराघरात पोहोचावा असे मला वाटते.. माझे वडील आदरणीय डॉक्टर विजयकुमार जी गावित हे माझे राजकारणातले पहिले गुरू आहेत त्याचबरोबर माझी आई डॉक्टर कुमुदिनी गावित या सुद्धा माझ्या पहिल्या राजकीय गुरु आहेत. राजकारण आणि सत्ता कारण जनतेच्या हितासाठीच करायचे असते हे बाळकडू मी त्यांच्याकडून शिकले आहे. म्हणूनच एक स्त्री लोकप्रतिनिधी म्हणून स्त्रियांच्या अंगाने काम करताना मी जरा जास्तच सजग असते. राजकारण करून सत्ता मिळवू शकतो परंतु कुठल्यातरी घटकाला सक्षम करण्यासाठी आपण त्या सत्तेचा सकारात्मक वापर केल्याशिवाय कोणाचेही राजकारण यशस्वी होत नाही. हे मला जिल्हा परिषदेच्या कारभारातून शिकायला मिळाले. त्याहीपेक्षा जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळताना मला त्याचा अंमल करता आला असे मी म्हणेन. मी एक सक्षम स्त्री आहे हे सिद्ध करून झालेले असून आता इतर स्त्रियांना उभे करण्यासाठी आपण काय करत आहोत? या प्रश्नाचे उत्तर मी एरवी नेहमीच शोधत असते. कारण माझ्या डोळ्यासमोर नंदुरबार शहरापासून धडगाव अक्कलकुवा पर्यंतच्या ग्रामीण भागातील महिला असतात. हंडाभर पाणी आणण्यासाठी धडपडणाऱ्या, रेशन दुकानावरून धान्य आणून घरातील दोन वेळच्या जेवणाची तजवीज करणाऱ्या, पतीच्या बरोबरीने शेताच्या बांधावर भर उन्हात राबणाऱ्या, घरात दोन पैसे यावेत म्हणून पडेल ते काम करण्याची तयारी ठेवणाऱ्या श्रमिक आणि कष्टकरी महिलांची आपल्या जिल्ह्यात मोठी संख्या आहे. अर्धवट शिक्षण सोडून द्यावे लागल्यामुळे अथवा लवकर लग्न करून संसार थाटावा लागल्यामुळे आकर्षक करियर करायला मिळाले नाही अशा भगिनींची संख्या बरीच आहे. त्या सर्वांना उमेद मिळावी त्या सर्वांना मोठा आधार देता यावा याची कायमच तळमळ वाटत असते. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मी आभार मानते ते एवढ्यासाठीच की देशात सर्वप्रथम त्यांनी या महिला घटकांना लक्षात घेऊन विविध अंगी योजना आणल्या आणि अर्थसहाय्य मिळवून दिले. नंदुरबार जिल्हा परिषदेची अध्यक्ष म्हणून मला अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला तेव्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याच कामाला गती देण्याची संधी मला मिळाली आज महिला दिनानिमित्त त्याचा अभिमान व्यक्त करते. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना खास महिला घटकांसाठी मला काहीतरी करता आले याचे मला समाधान वाटते. काही दाखले द्यायचे झाल्यास मी आवर्जून उल्लेख करेन की, महिला लोकप्रतिनिधी या नात्याने महिलांच्या समस्या सोडवण्यावर आणि त्या संबंधित योजना पोहोचवण्यावर मला भर देता आला. ग्रामीण भागातील महिलांना नेहमीच पाण्यासाठी वणवण करावी लागते. म्हणून जिल्हा परिषदेची अध्यक्ष बनल्यानंतर सर्वप्रथम गावागावातील पाणी प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं त्या कामाला प्राधान्य दिलं. जल मिशन योजनेअंतर्गत पुढच्या तीस वर्षांच्या पाणी नियोजनाची सोय करून देत अनेक गावांना जलकुंभ उभारून दिले. हर घर नल योजनेतून पाणी पुरवण्याचे काम प्रगतीपथावर आणले. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य ग्रामीण तीवनन्नोती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बाल विकास विभाग अशा वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमार्फत महिलांना न्याय देता आला. अवघ्या अडीच वर्षाचा कार्यकाळ हा सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता कधीही पुरेसा नसतो त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नसल्या तरी एक महिला लोकप्रतिनिधी नात्याने मला महिलांसाठी प्राधान्याने काहीतरी काम करता आले हे मी निश्चित सांगू शकते. जसे की, अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षण देण्याच्या योजनेतून पाचशेहून अधिक मुलींना प्रशिक्षित करण्यात आले. 970 किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटूंबनियोजन व कायदेविषयक प्रशिक्षण देत 24 लाखाहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आठ लाख बहात्तर हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून वेगवेगळ्या गावातील 339 महिला व मुलींना फुड प्रोसेसिंगचे प्रशिक्षण दिले. महिला व मुलींना इमिटेशन ज्वेलरी मेकींगचे प्रशिक्षण देणे, महिला व मुलींना व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण देणे, महिला व मुलींना पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारावा यासाठी प्रशिक्षण देणे, महिला व मुलींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण देणे या माध्यमातून सुद्धा अनेक महिला व मुलींना स्वयंरोजगार प्राप्त करून देता आला. महिलांना आत्मनिर्भर बनवणे अथवा स्वबळावर उभे करणे याचाच तर हा दाखला आहे… जिल्ह्यातील १८ प्राथमिक आरोग्य केंद्राना Oral and Breast Cancer Tool खरेदी करणे, नंदुरबार जिल्ह्यातील कार्यरत आशा वर्कर यांना आशा किट पुरवठा करणे, Mother Baby Care Kit खरेदी, इयत्ता ८ ते १२ वी तील गरजु विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप, बचत गटातील महिलांना लॅपटॉप व पासबुक प्रिंटर उपलब्ध करुन देणे या कामांसाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देत वंचित स्त्रियांना आणि मुलींना लाभ दिला. प्रत्येक गावातील महिला आत्मनिर्भर बनाव्या, त्यांनी स्वतंत्र उद्योग सुरू करावे यासाठी राज्य सरकारकडे मा. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि मा. खासदार डॉक्टर हिनाताई यांच्या माध्यमातून आपण सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यातूनच अनुसूचित जमातीच्या बचत गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी बचतगटांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य प्राप्त झाले तेव्हा माझ्या संपर्कातील अनेक महिलांना लाभ देता आला. बचत गटांना केंद्रीय विशेष अर्थसहाय्यातून प्रक्रिया प्रकल्प आणि छोटे उद्योग सुरू करायला मदत देता आली. परंतु समस्त श्रमिक आणि कष्टकरी महिलांच्या समस्या अगणित आहेत सरकार देत असलेले लाभ पुरेसे नाहीत आणि सेवाभावी संस्था करीत असलेले प्रयत्न देखील त्यापुढे अपूर्ण पडतात अशावेळी तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून संपर्कातील एका भगिनीला जरी सक्षम बनवले आधार देण्याचा प्रयत्न केला तरी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे खरे सार्थक होईल असे मला वाटते. सर्वांना पुन्हा शुभेच्छा! (लेखक डॉक्टर सुप्रियाताई विजयकुमार गावित, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष नंदुरबार)