दोन समाजात तेढ निर्माण कराल तर गय करणार नाही; पोलिस अधीक्षकांचा इशारा
झुंजार क्रांती न्यूज नेटवर्क .सुधीर गुरव नंदुरबार
नंदुरबार : दोन समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्हमजकुर सोशल मिडीयावर प्रसारीत केल्याने वाद उद्भवत आहेत. दरम्यान, सोशल मिडीयावर पोलीस दलाची करडी नजर असून कोणीही आक्षेपार्ह मजकुर प्रसारीत केल्यास कठोर कारवाई केली जाईल; असा इशारा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस.यांनी दिला आहे.छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब हे सध्या सोशल मीडियातील चर्चेचे प्रमुख विषय बनले असून विविध स्वरूपात व्यक्त होणे सध्या सोशल मीडियावर चालू आहे. नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार दिवसात चार गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्याप्रकरणी एका अल्पवयीनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रसंगी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यासाठी जमाव जमला होता. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी जाहीर आवाहन केले. हे आवाहन करताना त्यांनी म्हटले आहे की, दोन समाजात तेढ निर्माण करणारा मजकुर प्रसारीत केल्याने कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. यावर पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत संशयितांना अटक केली असून त्यांच्या विरोधात कलम १९९, ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मुलांकडून सोशल मिडीयाचा वापर होतो तेव्हा पालकांनी त्यांना समज देणे आवश्यक आहे. कारण मुलांवर प्रचलित कायद्यांन्वये गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होवुन करिअरदेखील धोक्यात येण्याची शक्यता असते. एकंदरीत सोशल मिडीयाचा वापर प्रत्येकाने जबाबदारीने केला पाहिजे.काही जण सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होवुन धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट प्रसारीत करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात येईल व कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस यांनी म्हटले आहे.